प्रधानमंत्री मोदीजींच्या जन्मदिनी सिपेट संस्थेतील 100 प्रशिक्षणार्थींना हंसराज अहीर यांचे शुभहस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी जी यांच्या 75 व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सिपेट चंद्रपूर या संस्थेमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 100 विद्यार्थ्यांना दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या शुभहस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले.
या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास चंद्रपूर मनपाचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगटा, वरोरा विधानसभेचे प्रमुख इंजि. रमेश राजुरकर, युवा नेते रघूवीर अहीर, भाजपा नेते नामदेव डाहुले, सिपेट चंद्रपूरचे संचालक व प्रमुख प्रविण बच्छाव, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद खेवले, घुग्घूस शहराध्यक्ष संजय तिवारी, भाजपा महानगर जिल्हा महासचिव शाम कनकम, किसान आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी पुनम तिवारी, प्रतिक शिवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगीच्या मार्गदर्शनात हंसराज अहीर यांनी सिपेट अंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रक्रीयेविषयी प्रशंसोद्गार काढत कौशल्य विकास हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्वपूर्ण पाऊल असून अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थी स्वयंरोजगार आणि उद्योगजगतात आत्मविश्वासाने पाय रोवण्यास सक्षम होतील असे सांगितले.
आम. किशोर जोरगेवार यांनी सिपेटच्या रोजगाराभिमुख उपक्रमाचे कौतूक करत दूरदृष्टीचे नेतृत्व असलेल्या हंसराजभैय्यांनी चंद्रपूर सारख्या उद्योगप्रधान ठिकाणी सिपेट ही संस्था स्थापन करून चंद्रपूरच नव्हे तर, वैदर्भिय युवकांना रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे अभुतपूर्व कार्य केल्याचे सांगितले.
सिपेटचे संचालक व प्रमुख प्रविण बच्छाव यांनी सिपेट अंतर्गत राबविण्यात येणाÚया कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती देत नोकरी उन्मुख कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, तरूणाईसाठी लाभप्रद ठरत असल्याचे सांगितले. गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षणामुळे उच्च पातळीवर नोकरीची संधी मिळवून देणारी ही संस्था असून, यंदाच्या बॅचमधील एकूण 100 प्रशिक्षणार्थ्यांपैकी 86 विद्यार्थ्यांना थेट कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीची संधी मिळाली, तर उर्वरित विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मेसर्स कोश इनोवेशन पुणे, कंपनीने 7 प्रशिक्षणार्थ्यांना, मेसर्स याझाकी इंडिया पुणे-19, मेसर्स जबील सर्कीट इंडिया पुणे-12, सतिश इंजेक्टो प्लास्ट नाशिक-6 व मेसर्स न्युबेनो हेल्थ केअर नागपूर या कंपनीने 40 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली असल्याची माहिती सिपेटद्वारा देण्यात आली. याप्रसंगी सुशिल उंदिरवाडे, वैष्णवी वाढई, दुर्गा वंजारी, वैष्णव येरणे या निवडप्राप्त प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. सिपेटचे पुष्कर देशमुख, पंकज वाघमारे, रामेश्वर सांगडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेत योगदान दिले.