मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत यश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळांनी पुन्हा एकदा आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची नोंद केली आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावून यश संपादन केले.
मनपा रयतवारी कॉलरी मराठी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सेजल सतीश केंद्रे हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा व पालकांचा मान उंचावला. तर पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कर्तव्या धूपेने द्वितीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात भर घातली. चित्रकला स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत यश मिळविले. यात आनंदी कोल्हे हिने द्वितीय क्रमांक, तर राशी खोब्रागडे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या विजेत्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रवार तसेच मनपा शिक्षक, पालक तसेच शाळा व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेली ही यशस्वी कामगिरी मनपा शाळांसाठी अभिमानाची बाब ठरली असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“मनपा शाळांतील विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास व स्पर्धात्मक वृत्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालक, शिक्षकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.” – प्रभारी मनपा आयुक्त विद्या गायकवाड.