श्रीकृष्ण नगरातील रस्त्यासाठी भीम आर्मीचे निवेदन
मायक्रॉन स्कूल परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील श्रीकृष्ण नगर परिसरातील मायक्रोन स्कूलजवळील मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारक, पादचारी नागरिक तसेच शालेय मुलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रवी लिहितकर यांच्या घराजवळील पाईप फुटल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढली असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने जात असल्यामुळे त्यांना विशेषतः धोक्याचा सामना करावा लागत आहे. अनेक लहान-मोठे अपघात या परिसरात घडले आहेत. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या बाजूला असलेला इलेक्ट्रिकल पोल अंधारात उभा असून, त्या पोलवर लाईट न लागल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो. रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. मात्र वारंवार तक्रार केल्यानंतरही नगरपालिकेने काेणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. या सर्व प्रश्नांवर तातडीने तोडगा निघावा, यासाठी भीम आर्मी संघटना भद्रावतीने नगरपालिकेकडे निवेदन सादर केले आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदन सादर करतेवेळी भीम आर्मी संघटनेचे भद्रावती तालुका अध्यक्ष राजरतन पेटकर, तालुका सचिव भाग्यश्री पवार, तालुका संघटक अतुल पाटील, विनोद कोडसे, स्वप्नील बनकर, करण सोंडवले, रोशन पेटकर, रवी लिहितकर, सोयेब शेख, चंदन वाडेकर, धनंजय मसारकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.