यकृताचा भाग देऊन मावस भावाने २२ वर्षीय करणला दिले जीवदान !
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांची मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणघाट येथील तरुण रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील करण गजानन ठाकरे या तरूणाचे वैद्यकीय कारणास्तव यकृत निकामी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून तो या आजाराशी झुंज देत होता. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय डॉक्टरांनी सांगितल्याने उपचारासाठी लागणारा ३० लाख रुपये खर्च करणे शक्य नव्हते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता व धर्मादाय मदत कक्षाच्या सहाय्याने तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
घरची परिस्थिती बेताची असल्याने ३० लाख इतका मोठा निधी उभारण्याचे प्रश्नचिन्ह त्याच्या कुटुंबियांसमोर होते. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांनी ठाकरे यांच्या उपचाराचा मोठा खर्च उचलला. ३० लाख रुपयांपैकी कुटबियांनी ५ लाख रुपये उभारले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तर उर्वरित २३ लाख रुपये धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून उपलब्ध करून देण्यात आले.
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात करणवर नुकतीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. वर्धा येथील करण ठाकरेला वडील नसल्याने घरची परिस्थिती बिकट आहे. त्यातच त्याच्या आईला पक्षाघात झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी करणच्या खांद्यावर होती. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच तो घरखर्चही भागवत होता. या विचित्र अशा परिस्थितीत डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे शस्त्रक्रियेच्या प्रचंड खर्चाचा प्रश्न उभा राहिला होता.
या अशा बिकट परिस्थितीत करण यांचा मावसभाऊ चैतन्य बगाडे (वय २४, पुणे) यकृत दान करण्यासाठी पुढे आले. त्यांनी आपल्या यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्यारोपणासाठी मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण प्रकरणात कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि त्वरेने निर्णय होऊन उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध झाली.
या प्रकरणातून मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांची तत्परता आणि मावसभावाचा त्याग या त्रिसूत्रीमुळे करणचा जीव वाचला अशी भावना गजानन ठाकरे यांची बहिण अश्विनीने व्यक्त केली.