विदर्भ महाविद्यालयात भव्य पदवीदान समारंभ
तहसीलदार रुपाली मोगरकर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली नवी दिशा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथे भव्य पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या आयोजनातून हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधोरेखित करणारा हा क्षण महाविद्यालयाच्या इतिहासातील अविस्मरणीय ठरला.
या समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तहसीलदार रुपाली मोगरकर यांचे “स्पर्धा परीक्षा” या विषयावर मार्गदर्शन. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली. आपल्या करिअरची निवड करताना चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. शैक्षणिक पदवी हा केवळ शेवट नसून आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत, फक्त त्या शोधून त्यांचा फायदा घेण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एच. शाक्य त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शिक्षणातून मिळालेली ज्ञानसंपदा ही केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नसून समाजात बदल करण्यासाठी वापरली पाहिजे,” असे त्यानी सांगितले.
समारंभाची सुरुवात डॉ. गजानन राऊत यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेतला तसेच या भव्य सोहळ्यासाठी घेतलेल्या तयारीची माहिती दिली. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. योगेश खेडेकर यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या ओघवत्या आणि आकर्षक शैलीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळेच वातावरण लाभले.
कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमित बोरकर यांचे योगदान विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून सोहळ्याला रंगत आणली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्याला प्रोत्साहन मिळाले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. गंगाधर लांडगे यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी प्राचार्य, प्रमुख मार्गदर्शक ,प्रमुख पाहुणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.