महाराष्ट्रातील सागवानाची तेलंगणात तस्करी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- वनपरिक्षेत्र जिवती अंतर्गत येत असलेल्या शेणगाव वन उपक्षेत्रातून शेजारच्या तेलंगणा राज्यात मौल्यवान सागवानाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून याला स्थानिक वनविभागाची मुकसंमती असल्याचे बोलले जात आहे.
चार दिवसांपूर्वी शेणगाव वन उपक्षेत्रातील राहपल्ली,बुध्दगुडा शिवारातुन सागवान वृक्षतोड करून लाकडाचे ओंडके भरलेले वाहन तेलंगणाकडे जात असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी तस्करांसोबत हातमिळवणी करून रोख ६० हजार रुपये व गावठी कोंबड्यावर समझोता करून दुसऱ्या ट्रॅक्टरने लाकडे वन कार्यालयात आणून लावारिस सागवान असल्याचा कांगावा केला अशी चर्चा शेणगाव परिसरात सुरू आहे.
शेणगाव नियतक्षेत्रातील घनपठार शिवारातुन दर आठवड्याला पिक अप वाहनाने सागवानाची तस्करी होत असल्याचे गावकरी सांगताहेत .
अवैधरित्या होणऱ्या सागवान तस्करीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर चिखली ( खु ) येथे वन विभागाने तपासणी नाका उभारला आहे मात्र गेल्या आठवड्यात अवैध सागवान भरलेल्या वाहनाने तपासणी नाक्यावरील बॅरिगेट्स तोडून वाहन पळविल्याचे वन कर्मचाऱ्याने कबुल केले.यावरून सागवान तस्करीला घेऊन वन कर्मचारी किती गंभीर आहेत हे दिसून येते.
एकीकडे वन विभाग ‘ एक पेड मां के नाम ‘ उपक्रम राबवतो तर दुसरीकडे तस्करांना मोकळे रान असा आरोप केला जात आहे.
काही नागरिकांच्या मते अवैध सागवान तस्करीत वन कर्मचारीच गुंतले असल्याचे बोलले जात आहे, कर्मचाऱ्यांच्या अशा भुमिकेमुळे कुंपणच शेत खाते असे म्हणण्यास हरकत नाही,शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊनही भागत नसल्यासारखे वन कर्मचारी अवैध सागवान तस्करीला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे.