ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खा. धानोरकर यांच्या मध्यस्थीने महाकाली मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या समस्या मार्गी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – महाकाली मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील व्यापारी प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडल्या. विशेषतः महिला व्यापाऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध आव्हानांविषयी सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. महाकाली मंदिराच्या परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना नवरात्रोत्सवादरम्यान त्यांच्या मूळ जागेवरून हटवून दुसरीकडे जागा दिली जात असे, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. यावर तोडगा म्हणून, आता या विक्रेत्यांना त्यांच्या मंदिर परिसरात दुकानाकरीता जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना नोंदणीकृत प्रमाणपत्र देऊन अधिकृत फेरीवाल्यांच्या दर्जा देण्यात येणार आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरक्षित होऊन त्यांचे आर्थिक नुकसान टळणार आहे.

त्यासोबतच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाविक आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी महानगरपालिका प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता रवींद्र हजारे, चंद्रपूर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, काँग्रेस नेते संतोष लाहमगे, इंटक नेते प्रशांत भारती आणि अनेक व्यापारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये