ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलणार _ आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

शैक्षणिक-सामाजिक प्रगतीच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार

चांदा ब्लास्ट

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन

चंद्रपूर येथे विदर्भस्तरीय मातंग समाज प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन

मातंग समाजाचे हक्क, समाजाची शैक्षणिक उन्नती आणि सामाजिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती देत समाजाच्या सबलीकरणासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहे. समाजाच्या शैक्षणिक उन्नती व सामाजिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

चंद्रपूर येथील हॉटेल तिरुपती क्राऊन येथे विदर्भस्तरीय मातंग समाज प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. या संवाद बैठकीला डॉ. गोपाल मुंधडा, वामन आमटे, परिमल कांबळे, श्री. गायकवाड, गजानन शिंदे, राजेश आमटे तसेच विदर्भातून आलेल्या मातंग समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मातंग समाजाचे प्रतिनिधी काही मागण्या व संकल्प घेऊन आले आहेत. त्यांच्या मागण्या विधानसभेत मांडून चर्चा घडवून आणण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मी त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभा आहे. 1 ऑगस्ट 2019 रोजी, शताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोस्ट तिकीट काढले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी दायित्व स्वीकारून ठाम संकल्प करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे.’

जोपर्यंत राज्यातील सर्व समाजघटकांचा संतुलित विकास होत नाही, तोपर्यंत कोणताही समाज, राज्य किंवा देश प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. यासाठी समाजात नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक तरुण घडविण्याची गरज आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भस्तरीय, जिल्हास्तरीय व मंडळस्तरीय समित्या स्थापन कराव्यात आणि त्या समाजातील पदवीधरांनी राज्यातील विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन समाज परिवर्तनासाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘समाजाला योग्य दिशा देण्यासाठी स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, नोकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी सक्षम संघटन करणे अत्यावश्यक आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य हे प्रत्येक समाजाचे मुलभूत अधिकार आहेत; ते मिळवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे.’ मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून, त्यांची पूर्तता करण्यासाठी विविध संसदीय आयुधांचा उपयोग करेल. विविध शासकीय योजनांचा योग्य लाभ घेतल्यास समाज वेगाने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू शकेल. असा विश्वास देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये