“स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान”
मनपा आरोग्य विभागातर्फे 13 विशेष आरोग्य शिबिरे

चांदा ब्लास्ट
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर, मध्य प्रदेश येथे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या 7 आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रात महिला व बालकांसाठी 13 विशेष आरोग्य शिबिरे शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत.तसेच सप्टेंबर महिना हा “पोषण महिना” असल्याने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे अभियान पोषण महिन्यासोबत एकत्रीत करुन माता, किशोरवयीन मुले/मुली आणि बालकांच्या पोषणावर विशेष समुपदेशन सत्रे घेण्यात येणार आहे.
सदर शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी व किशोरवयीन मुलींची तपासणी, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, रक्तक्षय निदानासाठी तपासणी, क्षयरोग निदानासाठी तपासणी, सिकलसेल तपासणी, गरोदर माता तपासणी व बालकाचे लसीकरण इत्यादी तपासणी घेण्यात येणार आहे. सदर शिबिरामध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ इत्यादी विविध तज्ञांमार्फत सेवा देण्यात येणार आहे.
सदर सर्व शिबिरांची वेळ ही सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. तरी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महिला व बालकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी केले आहे.