भद्रावती प्रशासकीय महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ मोहिमेसविद्यार्थ्यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती येथे डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय भद्रावतीच्या विद्यार्थांच्या पुढाकाराने ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ मोहिमेचे महत्व लक्षात घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वृक्ष लावून घेण्यात आले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत सन २०२५ करिता राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करणेच्या अनुषंगाने आपल्या विभागाला ठरवून दिलेल्या ५ लक्ष वृक्ष लागवडीचे लक्ष्य व त्याचे गांभिर्य लक्षात घेवून, डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात किमान १५० वृक्षांची लागवड करण्याचे यावेळेस ठरले.
सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, डॉ. प्रशांत पाठक यांच्या उपस्थितीत पार पडली असून महाविद्यालयीन स्तरावर अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा मानकर यांनी विद्यार्थांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. प्रा. प्रीती कनकट्टीवार, प्रा. प्रज्ञा लांडे, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद यांच्यासह असंख्य विद्यार्थांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात पुढाकार घेतला व कार्यक्रम यशस्वी केला.