ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात स्वयंशासन उपक्रम

इतिहास विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभागामार्फत आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी संतोष इंद्राळे

जिवती :- विद्यार्थ्यांमध्ये दडलेली सुप्त क्षमता आणि अंतर्भूत प्रतिभा यांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वृद्धिंगत करून त्यांच्या नेतृत्वगुणांना आणि संघटनकौशल्यांना फुंकर घालण्याच्या उद्देशाने, शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ महाविद्यालय, जिवतीचे इतिहास विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘स्वयंशासन उपक्रमाचे’ आयोजन करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वयंशासनाची जबाबदारी स्वीकारून विविध शैक्षणिक, प्रशासकीय व सांस्कृतिक कामगिरी उत्तमरीत्या पार पाडली. शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अध्यापन, अध्ययन, प्रशासकिय जबाबदारी मोठ्या शिताफीने निभावली. परीक्षणाअंती निकालानुसार कु. पल्लवी कांबळे आणि उर्मिला राठोड यांनी प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला, तर द्वितीय क्रमांक कु. महेश्वरी वारे हिने पटकाविला आणि प्रेम चव्हाण याने तृतीय क्रमांकाचा मान मिळविला. प्रोत्साहनपर गौरव कु. वैष्णवी चव्हाण हिचा करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन यथोचितरित्या सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

या प्रसंगी विद्यार्थ्यासमक्ष अभिव्यक्त होताना या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य म्हणाल्या की, “स्वयंशासन उपक्रम विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून देतो. त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळते आणि सर्वांगीण विकास साध्य होतो. अशा उपक्रमातून विद्यार्थी केवळ ज्ञानार्जन करत नाहीत, तर आत्मविश्वास, व्यवस्थापनकौशल्य आणि समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित करतात.” तर सोबतच “या उपक्रमामुळे विदर्भ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच सामाजिक जाणीव वाढीस लागून, त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होईल” असा मनोदय या उपक्रमाचे आयोजक डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाचे नियोजन व संयोजनाची धुरा प्रा. सचिन शिंदे, डॉ. वैशाली डोर्लीकर आणि प्रा. संजय मुंडे यांनी समर्थपणे सांभाळली. तर परिक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रा. गणेश कदम आणि प्रा. सुमित रहाटे यांनी योग्यरीत्या पार पाडली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा दिवस संस्मरणीय बनविताना उत्साह, शिस्त आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले. महाविद्यालयीन परिसरात दिवसभर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये