ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एस.टी. आरक्षणाची मागणी – गोरसेना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- गोरबंजारा, लंबाडा आणि लमाण समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) चे आरक्षण मिळावे, यासाठी गोरसेनेने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी आणि जिवती तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

         हैदराबाद गॅझेटमध्ये १९०१ ते १९४८ दरम्यान गोरबंजारा, लंबाडा आणि लमाण समाजाची नोंद अनुसूचित जमात म्हणून आहे. त्यानुसार तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात या समाजाला एस.टी. आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. मात्र, १९४८ नंतर राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशाचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला, तेव्हा गोरबंजारा समाजाचे मूळ अनुसूचित जमातीचे आरक्षण रद्द होऊन त्यांना विमुक्त जातीच्या संवर्गात टाकण्यात आले.

यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर मोठा अन्याय झाला आहे.मराठा-कुणबी समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. याच धर्तीवर गोरबंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करून एस.टी. आरक्षण देण्याची मागणी गोरसेनेने केली आहे. निवेदनात असे नमूद आहे की, १९५० पूर्वीचे दुर्मिळ पुरावे, सेंट्रल प्रोव्हिन्स व बेरार प्रांत आणि हैदराबाद गॅझेटमधील नोंदी गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत स्थान देतात. तरीही, भाषावार प्रांतरचना आणि राज्य पुनर्रचना कायद्यामुळे हा समाज मूळ आरक्षणापासून वंचित राहिला आहे.

        गोरबंजारा समाज डोंगर-दऱ्यांमध्ये राहणारा आदिम समुदाय असून, स्वतंत्र बोली, भाषा, पेहराव, परंपरा, तांडावस्ती आणि खानपान यामुळे अनुसूचित जमातीच्या सर्व निकषांना पात्र आहे. बापट आयोग, इधाते आयोग, भाटीया आयोग आणि डीएनटी-एस.टी. आयोगानेही या समाजाला एस.टी. आरक्षणासाठी सकारात्मक शिफारशी केल्या आहेत. तरीही, हा समाज जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित ठेवला गेला आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी गोरबंजारा समाजाच्या न्यायासाठी प्रयत्न केले. गोरसेना गेल्या २० वर्षांपासून मोर्चे, आंदोलने आणि निवेदनांद्वारे हा लढा लढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात गोरसेनेने मराठा-कुणबी समाजाच्या धर्तीवर गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एस.टी. आरक्षण देण्याची विनंती गोरसेनेकडून निवेदनातून केली आहे.

यावेळी चंद्रपर गोरसेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष ॲड. सुधाकर जाधव, जिल्हा संघटक इंदल आडे, कैलास जाधव, तालुका अध्यक्ष सतीश राठोड, उपाध्यक्ष उद्धव राठोड, नाईक अशोक जाधव, रामचंद्र चव्हाण, किशन जाधव, रामेश्वर राठोड, गिरजाबाई पंडित राठोड, रंगराव पवार, विजेश राठोड, अनिल जाधव, गुणवंत आडे, सावित्राबाई जाधव, आशा जाधव, सुमन जाधव, प्रेमदास राठोड यांच्यासह बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये