पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गृहकर्ज मंजुरीबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांची भेट
मुंबई मंत्रालयात झालेल्या चर्चेत पोलीस बांधवांच्या गृहकर्जासंबंधी अडचणींवर सविस्तर चर्चा

चांदा ब्लास्ट
अपर मुख्य सचिव (वित्त) श्री. ओ.पी. गुप्ता यांचे तातडीने सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
मुंबई – राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई मंत्रालय येथे वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घरबांधणीसाठी डीजी लोन मंजुरीच्या प्रश्नावर आ.मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली. या विषयाची दखल घेत अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांनी तातडीने यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांसाठी गृहकर्जाची समस्या गंभीर बनली आहे. राज्यातील सुमारे ५५०० पोलीस कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज (डीजी लोन) ऑगस्ट २०२३ पासून प्रलंबित आहे. अनेकांनी उसनवारी करून इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना टोकन रक्कम दिली आहे.
मात्र कर्ज मंजुरी विलंबित झाल्यामुळे ही रक्कम गमावण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवर येत असून, त्यामुळे ते आर्थिक व मानसिक तणावाखाली आले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे नागपूर येथे मागणी केली होती. मा. मुख्यमंत्र्यांनी त्वरित दखल घेत अपर मुख्य सचिवांना सदर विषयाची चौकशी करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. यासंदर्भात आज वित्त विभागाचे सचिव श्री.ओ.पी.गुप्ता यांची मंत्रालय येथे भेट घेऊन चर्चा केली.
याप्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहकर्जाशी संबंधित अडथळ्यांमुळे पोलीस बांधवांच्या घराचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी तातडीने निर्णय घेऊन योग्य तो दिलासा देण्याची विनंती केली.अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांनी या विषयाची दखल घेत तातडीने सकारात्मक कार्यवाही करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या भेटीनंतर राज्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गृहकर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा होऊन त्यांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.