ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

१६,७९८ नागरिकांनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट

मुंबई, दि. ९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १२,६५५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून ७ लाख ४०७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून २३६ शिबिरांतून एकूण १६,७९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.

२८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानात :

एकूण आरोग्य शिबिरे : १२,६५५

एकूण लाभार्थी रुग्ण : ७,०४,०७३

एकूण पुरुष लाभार्थी : ३,१३,५०८

एकूण महिला लाभार्थी : ३,०५,०३४

लहान बालक लाभार्थी : ८५,५०८

संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : १८,८००

एकूण रक्तदान शिबिरे : २३६

एकूण रक्तदाते : १६,७९८

महाराष्ट्रातील ७.०४ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर १६,७९८ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले आहे.

जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान

सर्वाधिक शिबिरे : पुणे – २५२५

सर्वाधिक रुग्ण तपासणी : पुणे – १,६५,७१८

सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे – ३,६१३

सर्वाधिक रक्तसंकलन : कोल्हापूर – ४,५०४

बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – २०,७८१

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये