बेलोरा घाटावरील जुनी हिंदू स्मशानभूमी उध्वस्त, स्वच्छता व संरक्षण भिंतीची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील वर्धा नदीच्या बेलोरा घाटावर असलेली सर्वात जुनी हिंदू स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. वेकोलीच्या वसाहतीत राहणाऱ्या हिंदू समाज बांधवांच्या या स्मशानभूमीत सर्वत्र काटेरी झुडपे व जंगली झाडे उगवली असून परिसर उध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
विशेषतः तेलगू भाषिक नागरिक आपल्या मृत नातेवाईकांना दफनविधी करतात. या ठिकाणी त्यांच्या पूर्वजांच्या अनेक कबरी आहेत. मात्र झाडाझुडपात या कबरी गहाळ झाल्यामुळे नागरिकांना आपल्या पूर्वजांच्या समाधीस्थळावर जाऊन प्रार्थना करणेही शक्य होत नाही. इतकेच नव्हे तर मृत नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी खड्डे खोदताना विषारी जीव-जंतूंमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन दिले. यात स्मशानभूमीची संपूर्ण स्वच्छता करावी, परिसराभोवती संरक्षक भिंत अथवा कुंपण (वॉल कंपाऊंड) उभारावे आणि स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.