भद्रावती तालुक्यात परतीच्या पावसाचे थैमान
गुंजाळा गावात पुराचे पाणी, अनेक अंतर्गत मार्ग बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
परतीच्या पावसाने भद्रावती तालुक्यात अगदी थैमान घातले असुन ढगफुटी सदृष्य आलेल्या या पावसामुळे कोंढा नाला, इरई नदी, माजरी गावालगतची शिरना नदिला पुर आल्याने तालुक्यातील ग्रामीण जिवन प्रभावित झाले आहे. तर या पावसामुळे तालुक्यातील अनेक अंतर्गत मार्ग बंद पडून अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.
मुसळधार पावसामुळे शिरना नदिला पुर आल्याने माजरी-कोंढा-भद्रावती हा मार्ग बंद पडलेला आहे. तालुक्यातील गुंजाळा गावालगतच्या नाल्याला मोठा पुर आल्याने कचराळा गावाचा संपर्क तुटला असुन गुंजाळा गावात पुराचे पाणी गावातील अनेक घरात शिरल्याने गावातील गावकऱ्यांचे दैनंदिन जिवन प्रभावित होऊन त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तलाठ्याच्या पथकाने गावातील पुरस्थितीची पाहणी करुन पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. नाल्याला पुर आल्यामुळे कचराळा-गुंजाळा मार्ग बंद पडून गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.भद्रावती नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या कुणाडा वसाहतीत पावसाचे पाणी शिरुन तलावसदृष्य परीसर झाला आहे.
शहरातील ऐतिहासीक डोलारा तलावाचा ओव्हर फ्लो झाल्याने परीसरातील सखल भागात पाणी शिरले आहे.तर शहरातील पिंडोणी तलावाचा ओव्हरफ्लो झाल्याने मंजुषा ले-आऊट परीसरातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाण्याचा लोंढा वाहात आहे.आजही सकाळपासून पाऊस परत सुरु झाल्याने पुरस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.