कामगार नेते नरेश पुगलिया यांच्या प्रयत्नाने मृतक कामगार यांना कंपनी कडून आर्थिक मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
– श्री. राजू देवाजी भोयर हा कामगार अवनीश लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत मराठा अदानी सिमेंट (अंबुजा सिमेंट) उप्परवाही येथे जवळपास 15 वर्षापासून कार्य करत होता. दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोज मंगळवार ला तो नेहमीप्रमाणे ड्युटीवर कार्य करत असताना त्याचा अपघात झाला, अपघात झाल्यानंतर त्याला चंद्रपूर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले परंतु त्यांची तब्येत अधिकच बिघडत चालली होती असे असताना त्यांचा दिनांक 24 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ड्युटीवर कार्यरत असताना त्यांचा अपघात झाला आणि नंतर मृत्यू झाला त्यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नंतर मराठा सिमेंट्स वर्क्स कामगार संघटना उप्परवाही यांचे पदाधिकारी आणि कंपनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मराठा सिमेंट वर्क्स कामगार संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी खासदार श्री. नरेशबाबू पुगलियाजी यांना कळविण्यात आले. कामगार नेते श्री. नरेशबाबू पुगलियाजी यांनी अंबुजा सिमेंट मधील अधिकाऱ्यासोबत चर्चा करून मयत श्री. राजू भोयर यांच्या परिवाराला पंधरा लाख रुपये व दवाखान्याचा खर्च दोन लाख रुपये तसेच त्यांच्या अंत्यविधीकरिता एक लाख रुपये असे एकूण 18 लाख रुपये व परिवारातील एका मुलाला ठेकेदारी मध्ये नौकरी देण्याचे ठरविण्यात आले.
या आधी सुद्धा कंपनीमध्ये अपघाती मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला श्री. नरेशबाबू पुगलियाजी यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला कंपनीकडून मागवून देण्यात आला होता. सर्व कामगारांनी मराठा सिमेंट वर्क्स कामगार संघटना चे अध्यक्ष श्री. नरेशबाबू पुगलियाजी तसेच संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार मानले.