बल्लारपूरचे विद्यार्थी देशात प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरावे – आमदार सुधीर मुनगंटीवार
ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धा, मार्गदर्शन व सत्कार समारंभ

चांदा ब्लास्ट
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्थेतर्फे बल्लारपूर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला नवी दिशा मिळाली असून, कलेतून भविष्याची स्वप्ने रंगविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी मनात ठाम ध्येय ठेवून संपूर्ण शक्तीनिशी झोकून द्यावे; कारण मेहनत व परिश्रम हाच खऱ्या यशाचा मंत्र आहे. बल्लारपूरचे विद्यार्थी देशात प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरावेत, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
बल्लारपूर येथील नाट्यगृहात ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धा, मार्गदर्शन व सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, शहराध्यक्ष ॲड. रणंजय सिंग, काशीनाथ सिंग, ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अंकुश अवधे, सचिव सुरज नागतुरे, श्री. दारी, शिवचंद्र द्विवेदी, जगदीश लवाडिया, रेणुकाताई दूधे विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थ्यांनो, स्पर्धेसाठी सज्ज व्हा. आपल्या कलागुणांचा विकास करा. मनात जे ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित कराल ते साध्य करण्यासाठी संपूर्ण मनोभावे स्वतःला झोकून द्या. मेहनत व परिश्रम हाच यशाचा खरा मंत्र आहे. खूप शिका, परिवाराची सेवा करा आणि परिवाराचे देशभर नावलौकिक करा. जे कराल ते पूर्ण शक्ती व ऊर्जेने करा, उज्ज्वल भविष्य घडवा. असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
सर्वांच्या सहकार्य आणि शुभेच्छांमुळे मला ऊर्जेने कार्य करता आले असून, आगामी काळात अनेक नवे उपक्रम हाती घेण्याचा संकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा आणि महाराष्ट्राचे राज्यगीत प्रत्येक शाळेत गुंजत राहावे, हीच माझी खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
मला कोहिनूर ऑफ इंडिया हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला, याचा मला अभिमान आहे. मात्र हा सन्मान माझा नसून, तो आपल्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छा, सहकार्य आणि आशीर्वादाचा परिपाक आहे. आपल्या ऊर्जेतून व शक्तीतूनच मला कार्य करण्याची प्रेरणा मिळते. मी भाग्यशाली आहे, मला अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्याची संधी लाभली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
गुणवंतांचा सत्कार
दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट टक्केवारीने उत्तीर्ण झाल्याबद्दल सोनल मून, अवंती धोंगडे, सचिन यादव व विधी देवगडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.
वनजमीन पट्टे वाटप
वनमाला अशोक मेश्राम, अजमेर खान इदायत खान पठाण, चंदा कुमार ठमके, जुलेखा बेगम अहमद हुसेन, रेखा कैलाश वतारे, ताराबाई गुरुकुंतावार, छायाताई तेलंग आणि अजय भगत आदिनाथ यांना वनजमिनीचे पट्टे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.