पक्षाचा विचार प्रत्येक घरी पोहोचवून समाजहितासाठी काम करा – आ. जोरगेवार
घुग्घुस येथील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट
आजचा कार्यक्रम हा फक्त प्रवेशाचा किंवा औपचारिक कार्यक्रमाचा क्षण नाही, तर समाजहितासाठी नवे वचन देण्याचा क्षण आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तुम्ही राष्ट्रसेवेच्या एका महान प्रवासाची सुरुवात केली आहे. भाजप हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणारा पक्ष आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही घोषणा म्हणजेच आपली विचारधारा आहे. या विचारधारेचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
घुग्घुस येथे आज शनिवारी पक्ष प्रवेश आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते प्रा. हेमंत उरकुडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोबतच सय्यद इद्रीस, नीतू जायसवाल, सविता गोहणे, मनीषा मेश्राम, उज्वला उईके, रमन तांद्रा, गुरुदास तंग्रपवार, मल्लेश बल्ला, किशोर धनकमारे, लक्ष्मी चांदेकर, सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वाखाली ४०० हून अधिक महिला व युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री मनोज पाल, महामंत्री सविता दंढारे, तुषार सोम, नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, आशिष मासिरकर, अमोल शेंडे, राशिद हुसेन, सायली येरणे, संतोष नुने, राजकुमार बोरचेलवार, मुन्ना रोडे, संजय भांगडे, श्याम अगदारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भाजप हा केवळ राजकीय पक्ष नाही तर तो एक राष्ट्रभक्तीची चळवळ आहे. या पक्षाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, विकासाभिमुख विचार आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास ही घोषणा आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केलेला तुमचा पक्षप्रवेश हा पक्षाला आणखी बळकट करणारा आहे.
भाजप कार्यकर्त्यांचे स्थान फार मोठे आहे. येथे कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच पक्ष बळकट होतो. तुम्ही ज्या ऊर्जेने आज प्रवेश केला आहे, तीच ऊर्जा पुढील काळात संघटनाच्या कार्यात वापरावी. भाजप सरकारने गरीब, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. उज्ज्वला योजनेतून घराघरात गॅस पोहोचला, प्रधानमंत्री आवास योजनेतून लाखो घरे उभी राहिली, जनधन योजनेतून गरिबांना बँकेत खाते मिळाले, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी सुरु झाला, तर युवकांसाठी स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया सारख्या योजनांमधून संधी निर्माण झाल्या.
पक्षात प्रवेश करणे ही पहिली पायरी आहे. आज ४०० कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झालात, यामुळे संघटनाला नवसंजीवनी मिळाली आहे. तुमच्या ऊर्जेने आणि तुमच्या प्रामाणिकपणाने आपण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित करू, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.