ऊर्जानगरात चिमूर आष्टी ऑगस्ट क्रांतिवीरांना वाहिली श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर (ऊर्जानगर) – राष्ट्रसंतांनी “झाड झडूले शस्त्र बनेंगे,पत्थर सारे बॉम्ब बनेंगे या क्रांतिकारी भजनाने चिमुरकरांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली.दि. १६ ऑगस्ट १९४२ ला चिमूर क्रांतीकारकांनी ब्रिटिश सरकारविरूध्द केलेल्या संघर्षामुळे चिमूर वासियांना गुलामीच्या जोखडातून मुक्त केले होते. १९४२ च्या काळात स्वतंत्र झालेले देशातील पहिले गाव म्हणजे चिमूर . सन १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीचे जनक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या लढ्यातील क्रांतिवीरांच्या बलिदानाची आठवण येणाऱ्या नवीन पिढीला आठवण राहावी या हेतूने श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रसंत आगस्ट क्रांतीपर्व स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर सिटीपिएस चे उपमुख्य अभियंता रविंद्र सोनकुसरे उद्घाटक म्हणून लाभले होते. प्रमुख वक्ते म्हणून सरदार पटेल महाविद्यालयातील प्रा.डाँ. धनराज मुरकुटे, सरपंच मंजूषाताई येरगुडे ऊर्जानगर, रामदास तुमसरे अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर,प्रा.नामदेव मोरे ,महिला अध्यक्षा सविता हेडाऊ,सेवाधिकारी शंकर दरेकर, पर्यावरणप्रेमी मारोती पिदुरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी उदघाटक रविंद्र सोनकुसरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर प्रमुख वक्ते प्रा. धनराज मुरकुटे यांनी चिमूर च्या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला. राष्ट्रसंतांच्या पावन प्रेरणेने घडलेली ही चिमूर क्रांती ही जगभर पसरली व त्यामुळे देशवासियांच्या मनात स्वातंत्र्यप्राप्तीचा अदम्य विश्वास निर्माण झाला होता, असे ते म्हणाले .
यावेळी कार्यक्रमाध्यक्ष बंडोपंत बोढेकर यांनी आगष्ट क्रांती निमित्त समयोचित भाष्य करून उर्जानगर शाखेनी सुरू ठेवलेल्या सामाजिक क्रांतीचे कौतुक केले.
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा पहिला ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विजय मार्कंडेवार स्मृति पर्यावरण मित्र पुरस्कार ज्येष्ठ वृक्षप्रेमी मारोती पिदुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास तुमसरे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र पोईनकर यांनी केले. आभार प्रदर्शन देवराव कोंडेकर यांनी केल्यानंतर राष्ट्रवंदना गायनाने समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गुरुदेव प्रेमींचे सहकार्य लाभले.