ताज्या घडामोडी

भीषण अपघातात 3 जागीच ठार तर महिलेचा रुग्णालयात मृत्यू – ट्रकच्या धडकेत ऑटो चकणाचुर

महामार्ग निर्मिती कंपनीच्या ट्रकने घेतले बळी - आ. देवराव भोंगळे ह्यांची घटनास्थळी धाव

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा शहरापासून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या कापणगाव जवळ आज दुपारी मृत्यूचा थरार बघायला मिळाला असुन GRIL कंपनीच्या हायवा ट्रकने प्रवासी ऑटोला दिलेल्या धडकेत 3 व्यक्तींचा जागीच मृत्यु झाला तर एका महिलेचा राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असुन इतर 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार राजुरा येथून प्रवासी घेऊन पाचगाव कडे जात असलेल्या ऑटोला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या RJ 14 GQ 9221ट्रकने जोरदार धडक दिल्याने प्रवासी ऑटो अक्षरशः चकनाचुर झाला असुन ह्या अपघातात रवींद्र बोबडे, मेश्राम व अन्य एक अशा तिघांचा जागीच मृत्यु झाला तर एका महिलेचा राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे ह्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली तसेच जखमींना योग्य व तत्परतेने उपचार मिळावे ह्यासाठी निर्देश दिले असुन अपघाताला कारणीभूत ठरलेल्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सांगितले आहे.

राजुरा तालुक्यातून शेजारील तेलंगणा राज्याशी राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात येत असुन त्यासाठी GRIL कंपनीला कंत्राट देण्यात आले असुन ह्या कंपनीचे अवजड वाहने नेहमीच भरधाव वेगाने माती तसेच इतर साहित्य नेत असतात. राजुरा वरुर दरम्यान अर्धवट असलेल्या रस्त्यांनी माती भरलेले भरधाव ट्रॅक नागरिकांच्या जीवाशी खेळत असुन ह्या मार्गावर देखील भविष्यात ह्यापेक्षा भीषण घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. इतके सर्व प्रकार घडत असूनसुद्धा वाहतुक विभाग ह्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. नियमानुसार माती किंवा तत्सम वस्तूंची वाहतुक करताना ट्रक वर ताडपत्री बांधणे बंधनकारक असुनही GRIL कंपनी उघड्या ट्रकमधून बेदरकारपणे माती वाहतुक करीत असुन ह्यावर आतातरी पोलिस प्रशासन आळा घालेल का व जनतेच्या जीवाशी GRIL कंपनी करत असलेला खेळ थांबवेल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये