ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – ईश्वर कातकडे

यंदाचा गणेशोत्सव सालाबादाप्रमाणे शांततेत साजरा करा - प्रशासनाचे जनतेला आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने 

वरोरा : २७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या ‘गणेशोत्सव’ आणि आगामी ‘ईद – ए- मिलाद’ सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता, जातीय सलोखा आणि सामाजिक सौहार्द राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक उत्सवात कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सर्वांनी अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला यथोचित सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी येथे केले. वरोरा, भद्रावती व माजरी पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात वरोरा उपविभागातील गणेश मंडळ, ईद – ए – मिलाद व शांतता कमिटी बैठक – २०२५ आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

    मंचावर चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, वरोरा उपविभागीय अधिकारी अमर राऊत (भा.प्र.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल, तहसीलदार योगेश कौटकर, महावितरण कंपनीचे अभियंता सचिन बदखल, वरोरा पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

     कातकडे पुढे म्हणाले की, या महोत्सवातंर्गत शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळाचे मुल्यांकन करून विजेत्या मंडळाला तालुका , जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानी गौरविण्यात येणार आहे. यात डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांच्या वापराला प्राधान्य, संस्कृती – परंपरेचे जतन व संवर्धन, निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण, सामाजिक उपक्रम, शाडू मातीची मुर्ती या अंतर्गत स्पर्धा व सामाजिक उपक्रम आदिला प्राधान्य देणाऱ्या गणेश मंडळाला तालुका स्तरावर २५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त यातून राज्य स्तरावर निवड झालेल्या गणेश मंडळाला राज्य स्तरावर गौरविण्यात येईल. या स्पर्धेत सर्व मंडळ सहभागी होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डीजे वापर बाबत महेंद्र बेडेकर प्रकरणाचा हवाला देत डीजे चा वापर केल्यास गुन्हा दाखल होईल तसेच नियमांची पायमल्ली केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाच्या बैठकीला न.प.मुख्याधिकारी यांची अनुपस्थिती ही शोकांतिका – खा. धानोरकर

        गणेशोत्सवात दरवर्षी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील लाखो नागरिक शहरात येतात. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वरोरा शहरात सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. विदर्भातील सर्वात जुन्या न.प. पैकी एक, अर्थात १५८ वर्ष झालेल्या वरोरा नगर परिषद संबंधित अनेक समस्या आहेत. त्यात वरोरा शहरातील रस्त्यांची अवस्था अंत्यंत दयनीय आहे. गणेशोत्सवाच्या ८-१५ दिवसांपूर्वी नगर परिषदे तर्फे आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असताना त्यात अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत. त्यातच ‘ गणेशोत्सव ‘निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी वरोरा शहरात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असतानाही या बैठकीला मुख्याधिकारी अनुपस्थित होत्या. ही खेदाची बाब असून यापेक्षा दुसरी शोकांतिका आपल्यासाठी नाही, अशी नाराजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.

     त्या पुढे म्हणाल्या की, शहरात सामाजिक सलोखा, शांतता आणि सामाजिक उत्तरदायित्व नेहमी जपल्या गेले आहेत. सर्व गणेश मंडळ आपापली जवाबदारी पार पाडतील असा, विश्वास व्यक्त करीत सर्वांना ‘गणेशोत्सव व ईद ए मिलाद ‘ या सणाच्या शुभेच्छा दिल्या.

शासनाच्या वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी मह महत्त्वाची – अमर राऊत

       सर्वांना शांतता व सुरक्षित वातावरणात आपले सण साजरे करता आले पाहिजे. जितका आपला आनंद जास्त तितक्या आपल्या जबाबदाऱ्या वाढतील. तुम्ही या सणाचे खरे आयोजक, तर तुमची जबाबदारी जास्त, असे गणेश मंडळांना सूचित केले . प्रशासन व नागरिक एका पेजवर आले पाहिजे. सणासुदीच्या काळात शासनाच्या वेगवेगळ्या विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी आराखडा बनवा व अंमलबजावणी सुरू करा. अशा सूचना उपविभागीय अधिकारी अमर राऊत (भा.प्र.से.) यांनी यावेळी दिल्या.

    प्रास्ताविकात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल यांनी मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यात मंडप उभारणी, मूर्ती स्थापना, मिरवणूक , बॅनर – पोस्टर, पताका इत्यादी गोष्टी करतांना सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, सण साजरे करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

    ‘अनंत चतुर्दशी ‘ माजरी येथे दि.६ सप्टेंबर, वरोरा येथे दि. ७ सप्टेंबर व भद्रावती येथे दि.८ सप्टेंबर रोजी होणार आहे. वरोरा शहरात’ ईद – ए- मिलाद ‘ व गणेश विसर्जन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी, ईद – ए-मिलाद कमिटी प्रतिनिधी, शांतता कमिटीतील सदस्यांनी सूचना करीत सकारात्मक चर्चा केली.

        यावेळी अधिवक्ता जयंत ठाकरे, गजानन बोढाले, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, माजी नगरसेवक छोटुभाई शेख, बाबा भागडे, राजेंद्र मर्दाने, प्रमोद काळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, आसिफ रजा, अयुब खान, किशोर डुकरे, विलास नेरकर, सरला ठमके, सुनंदा जिवतोडे, त्रिशूल घाटे, प्रवीण गंधारे, योगेश डोंगरवार, दादा जयस्वाल, माजी सैनिक चिमूरकर यांच्यासह प्रशासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस पाटील व अन्य मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.

 संचालन पोलीस उपनिरीक्षक अनिल मेश्राम यांनी केले व आभार पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी साठी वरोरा, भद्रावती, माजरी पोलीस स्टेशनचे प्रभारी व कर्मचारी इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये