चंद्रपूर काँग्रेसचा उपक्रम – ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’
28 ऑगस्टला काँग्रेसच्या सुशिक्षितांचा मिलन सोहळा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : शिक्षण आणि डिग्री हा प्रत्येकाचा अभिमान आहे. ते लपवून किंवा दडवून ठेवण्याऐवजी त्याचा अभिमान बाळगणे आणि इतरांनाही आपल्या शिक्षणाचा व डिग्रीचा अभिमान वाटावा, हे सकारात्मक तत्त्व समाजातील युवकांमध्ये रुजविण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे एक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.
काँग्रेस आणि घटक पक्षांतील सर्व सुशिक्षित कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्चशिक्षितांचा मिलन सोहळा 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ या नावाने शिक्षण व डिग्रीचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिली.
सध्या देशात स्वतःची डिग्री लपविण्याची मानसिकता निर्माण झालेली असून यामुळे सुशिक्षितांमध्ये नैराश्य निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणाबद्दल आणि डिग्रीबाबत अभिमानाची भावना जागृत व्हावी, हाच या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. राजकारणातही उच्चशिक्षितांचा सन्मान व्हावा आणि त्यांना त्यांच्या शिक्षणासह डिग्रीचा अभिमान वाटावा, असे रितेश तिवारी यांचे मत आहे.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ या उपक्रमांतर्गत काँग्रेस आणि घटक पक्षांतील सर्व सुशिक्षित कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मिलन सोहळा 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम कस्तुरबा चौक येथील काँग्रेस कार्यालयात पार पडणार आहे. या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या डिग्री सार्वजनिक करून त्या आपल्या सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात आणि त्याचा अभिमान बाळगावा, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे. तसेच 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता होणाऱ्या या मिलन सोहळ्यास सर्व काँग्रेस व घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहावेत, असेही त्यांनी आवाहन केले आहे.