विवेकानंद महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
श्रुती कामतवार, साक्षी मशाखेत्री, शालिनी खिरडकर यांचा जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार ठसा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील ॲथलेटिक्स खेळाडू श्रुती कामतवार, साक्षी मशाखेत्री व शालिनी खिरडकर यांनी चंद्रपूर जिल्हास्तरीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत पदकांची कमाई करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. या तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेत श्रुती कामतवार हिने ३००० मीटर धावणे स्पर्धेत रजत व ५००० मीटर धावणे स्पर्धेत कास्यपदक पटकाविले. साक्षी मशाखेत्री हिने थाळीफेक मध्ये सुवर्ण, तर ३००० मीटर व ५००० मीटर धावणे स्पर्धेत प्रत्येकी रजत पदक मिळविले. शालिनी खिरडकर हिने १०० मीटर आणि २०० मीटर धावणे स्पर्धेत रजत पदकाची कमाई केली.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संगीता आर. बांबोडे यांना दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्राध्यापक वृंद, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंच्या पराक्रमामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तसेच भद्रावती शहराचे नाव उज्ज्वल झाले आहे.