वणीला जायचं शंभर रुपये सीट
७२ रुपयाच्या प्रवासावर शंभरची भुर्दंड ; दोन जिल्ह्याला जोडणारा मार्ग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वणी ते कोरपना या महत्त्वाच्या मार्गावर शिरपूर ते वेळाबाई फाटा दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की, या मार्गावर धावणाऱ्या बस फेऱ्या व ट्रॅव्हल्सने आपली सेवा थांबवली आहे. परिणामी या मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
सरकारी बसेस व प्रवासी ट्रॅव्हल्स बंद झाल्याने नागरिकांकडे ऑटो हा एकमेव पर्याय उरला आहे. परंतु ऑटोवाल्यांनीही संधीचा फायदा घेत, मनमानी दर आकारणीला सुरुवात केली आहे. कोरपना ते वणी हा साधारण ७२ रुपयांचा प्रवास आता १०० रुपयांवर पोहोचला आहे. शिवाय, हाउसफुल भरलेल्या ऑटोतून जीवघेणा प्रवास करावा लागत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या डांबरीकरण व दुरुस्तीबाबत अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाला विनंती अर्ज सुरू आहे. त्याला मात्र केराचीच टोपी दाखवण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधीची रस्त्याविषयीची भूमिका आक्रमक नाही.
तसेच बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या रस्त्याची दशा बदललेली नाही. प्रवासी वर्गाला या दुर्लक्षितपणाचा थेट फटका बसत असून रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे हाल होत आहेत.
विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामस्थ सारे त्रासले
या मार्गावरून परिसरातील गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी वणी,शिरपूर, कोरपना, वेळाबाई, शिंदोला, कुरइ येथे जातात. याचप्रमाणे कर्मचारी व अन्य प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना जीव घेण्या खड्ड्यामुळे स्वतःच्या वाहनाने जाण्या येण्या शिवाय पर्याय उरला नाही.
लोकप्रतिनिधीची आश्वासने फोल
आजी माजी लोकप्रतिनिधीनी या मार्गाचे चौपदरीकरण करू असे आश्वासन अनेकदा दिली. परंतु सद्यस्थितीत असलेला साधा रस्ताही ते बनवू न शकल्याने मार्ग आता जाण्या योग्य ही उरला नाही. त्यामुळे नागरिकांकडून नाराजगी व्यक्त होत आहे.