ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रात ‘क्यूआर कोड बेस्ड’ प्रणालीचे उद्घाटन

उत्कृष्ट कर्मचा-यांचाही सत्कार

चांदा ब्लास्ट

बांबु संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली परिसरात बांबू सेटम येथे ‘क्यूआर कोड बेस्ड’ माहिती प्रणालीचे उद्घाटन प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) तथा वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार, विभागीय वन अधिकारी ज्योती पवार, वन अकादमीचे सत्र संचालक संजय दहिवले, भारती रेड्डी तसेच संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रणालीअंतर्गत प्रत्येक बांबू प्रजातीसमोर लावलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर पर्यटक, संशोधक आणि विद्यार्थी आपल्या मोबाईलवर त्या प्रजातीची वैज्ञानिक, स्थानिक व वापराविषयीची सविस्तर माहिती पाहू शकतील. ही माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांच्या अनुभवात वाढ होऊन, विद्यार्थ्यांना व संशोधकांना अभ्यासासाठी मौल्यवान माहिती सहज उपलब्ध होईल. ही अभिनव संकल्पना संचालक एम.एस.रेड्डी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली आहे

बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या प्रगतीकरिता केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम मेश्राम, हस्तकला निर्देशक किशोर गायकवाड, पर्यवेक्षिका योगिता साठवणे, माहिती तंत्रज्ञान सहाय्यक दिपा बिसेन यांचा तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. रेड्डी यांनी बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले. विविध तंत्रज्ञानाचा वापर करून वंचित व दुर्बल घटकांना त्यांच्या जीवन उन्नतीसाठी सक्षम करणे, तसेच केंद्राच्या माध्यमातून युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ही या केंद्राची मोठी भूमिका आहे. बांबू हा पर्यावरणपूरक, टिकाऊ व बहुउपयोगी नैसर्गिक संसाधन असून बांधकाम, फर्निचर, हस्तकला, कागद व ऊर्जानिर्मिती यांसह अनेक उद्योगांत त्याचा व्यापक वापर होऊ शकतो. यासाठी या केंद्राच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार यांनी तर आभार वनपाल विलास कोसनकर वनपाल यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये