भगिनींचा विश्वास हा आमच्या ताकदीचा सर्वात मोठा स्तंभ – आ. किशोर जोरगेवार
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पडोली येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या वतीने पडोली येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या सन्मान, सुरक्षेसाठी व प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांनी भगिनींचा विश्वास हा आमच्या ताकदीचा सर्वात मोठा स्तंभ आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, आशिष वाढई, दुर्गा वावणे, ममता मोरे, ज्योश्ना वनकर, सुरेखा पाटील, उज्वला नलगे, राकेश पिंपळकर, गुड्डू सिंग, नकुल वासमवार, सुरेश पिदुरकर, अचल चार्लेकर, डॉ.दशरथ झाडे, दयानंद नागरकर, महादेव पिदुरकर, नाकेश निखाडे, महेश येनुरकर, सुभाष पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मतदारसंघात विकासकामे करताना महिलांची सुरक्षा आणि सन्मान याला आपण नेहमी केंद्रस्थानी ठेवले आहे. महिला सक्षमीकरणासाठी मतदारसंघात अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. विविध प्रकारच्या महागड्या कोर्सचे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार महिलांना ब्युटी पार्लर, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग यांसारख्या प्रशिक्षणांचा लाभ मिळाला असून यातील अनेक भगिनींनी स्वतःचा रोजगार सुरू केला आहे.
रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा दिवस नसून संरक्षण, सन्मान व साथ देण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीच ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने कार्य करते. महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षा यासाठी मी सदैव तत्पर राहीन. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, तिथे देवता वास करतात. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे.यासाठीच भाजप सरकारने लाडकी बहिण योजना, उज्ज्वला योजना, महिला बचतगटांना कर्जसहाय्य अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजना आपल्या भगिनींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत, असेही आ. जोरगेवार यांनी सांगितले. या कार्यक्रमात शेकडो भगिनींनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखीचे पवित्र बंधन बांधले. आमदारांनीही भेटवस्तू देत भगिनींचे आशीर्वाद घेतले.