बकरी पालन योजनेतील अनुदान रखडल्याने महाराष्ट्रातील १९० प्रकल्पांचे भवितव्य अधांतरी
खा. धानोरकर यांच्या प्रश्नावर संसदेत केंद्र सरकारचा धक्कादायक खुलासा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूरमधील पाचपैकी तीन प्रकल्पही प्रलंबित
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘राष्ट्रीय पशुधन मिशन’ (NLM) अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या बकरी पालन उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील मोठा विलंब खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नातून समोर आला आहे. मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून ही गंभीर स्थिती उघड झाली असून, महाराष्ट्रात एकूण ३६६ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असताना त्यापैकी तब्बल १९० प्रकल्पांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता, पाचपैकी तीन प्रकल्पही विविध स्तरांवर रखडले आहेत.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्रीय पशुधन अभियान’ नावाचा कोणताही विशिष्ट कार्यक्रम भारत सरकारकडून राबवला जात नाही. मात्र, ‘राष्ट्रीय पशुधन मिशन (NLM)’ अंतर्गत ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ चालवला जात आहे. या योजनेत बकरी प्रजनन फार्मसाठी ५०% भांडवली अनुदान दिले जाते, ज्याची कमाल मर्यादा ₹५० लाख आहे. तरीही, मोठ्या प्रमाणात प्रकल्पांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. मंत्रालयाने या विलंबामागे अर्जदारांनी प्रकल्प पूर्ण करण्यास घेतलेला वेळ आणि बँकांनी कर्जाचे हप्ते जारी करण्यास केलेला विलंब ही कारणे दिली आहेत.
अनुदान वितरणासाठी कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केल्यामुळे, या योजनेच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला कोणतीही विशेष मदत देण्याचा प्रस्ताव नसल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे, ज्यामुळे उद्योजक आणि शेतकरी अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत. या प्रश्नानंतर सदर प्रकल्प सुरु करण्याकरिता केंद्र सरकारने तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.