ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये मतदार यादीतील धक्कादायक नाम नोंदी

काँग्रेसकडून “वोट चोरी”चा आरोप 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आश्चर्यकारक निकालानंतर राज्यासह देशभरातील जनतेमध्ये ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीचा सहा महिन्यांचा सखोल अभ्यास करून पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. त्यांनी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत विजयी करण्यासाठी मदत करत असून प्रत्यक्ष पुराव्यासह “वोट चोरी”चे धक्कादायक प्रकरण देशासमोर मांडले.

राहुल गांधी यांच्या या खुलाशानंतर घुग्घुस काँग्रेस शहराध्यक्ष आणि पक्षातील नेत्यांनी शहर व ग्रामीण भागातील मतदार यादीची तपासणी केली असता अनेक त्रुटी व भोंगळ कारभार उघडकीस आला. घुग्घुस शहरातील केमिकल वॉर्डातील बंद असलेले घर क्रमांक 350 (सचिन बांदूरकर यांच्या मालकीचे) येथे मतदार यादीत विविध जाती-धर्माच्या आडनावांसह तब्बल 119 मतदार दाखल असल्याचे आढळले. प्रत्यक्ष तपासणीसाठी काँग्रेस पदाधिकारी तेथे गेले असता घर बंद असून कोणीही राहत नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय शहरात शून्य क्रमांकाची अनेक घरे, तसेच 100 क्रमांकाच्या घरातही अनेक मतदार नोंदवले असल्याचे प्रकार उघड झाले.

घुग्घुसपुरतेच नव्हे, तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पिपरी या छोट्याशा गावातही एकाच घरात जवळपास 100 मतदार दाखल असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात देशातील विविध राज्यांमधून लोक वास्तव्यास आले असले, तरी मतदार यादीत एकाच पत्त्यावर असंख्य नागरिकांची नावे दाखविल्याने मतदारांची खरी ओळख कशी पटवायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसने आरोप केला की हा मुद्दाम केलेला प्रकार असून चंद्रपूर विधानसभेत मोठ्या प्रमाणात वोट चोरी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे “वोट चोरीचे सरकार” असल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छ व पारदर्शक यादी प्रकाशित करावी, तसेच अशा बोगस नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.

लवकरच निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांनी दिला.

या वेळी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजुरेड्डी प्रौद्दाटुरी, सैय्यद अन्वर, अलीम शेख, रोशन दंतलवार, दीपक पेंदोर, सीनू गुडला, कपिल गोगला, निखिल पुनगंटी, विजय माटला, कुमार रूद्रारप, अंकुश सपाटे, सुनील पाटिल, रोहित डाकुर, सचिन बांदूरकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये