नाते आपुलकीचे संस्थेद्वारे दुर्धर आजाराने ग्रस्त सुमितला मोलाची मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
नाते आपुलकीचे ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून अविरत अनाथ,अपंग,अपघातग्रस्त,आजारग्रस्त अशा गरजवंतांच्या मदतीला धावून जात आहे.अगदी कमी वेळेत नाव लौकीकास आलेली ही संस्था आपल्या निरपेक्ष वृत्तीने आणि पारदर्शक कारभाराने समाजमनावर नाव बिंबविण्यात यशस्वी ठरली आहे,कोणत्याही प्रसिद्धीच्या जाळ्यात न पडता संस्थेच्या 350 सदस्यांच्या सामूहिक मदतीने निराश्रित, गरजवंतांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम ही संस्था आजघडीला अविरत करत आहे.
गडचांदूर येथील श्री.आतिशजी ठाकरे यांचा आठव्या वर्गात शिकणारा मुलगा सुमित याला काही महिन्यांपूर्वी एका दुर्धर आजाराने ग्रासले,त्याच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता होती,घरची परिस्थिती अतिशय खालावलेली आणि बिकट असतानाही त्याच्या उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न त्याचे वडील हे करत आहेत, पण प्रश्न पैशाचा असल्याने मोठी रक्कम खर्च करण्यात त्यांना खूप अडचणी येत आहेत, अशातच संस्थेचे सदस्य श्री.राजेश कांबडे यांच्यातर्फे संस्थेकडे मदतीची अपेक्षा केली,त्यानुसार संस्थेच्या सर्व सदस्यांच्या सहमतीने सुमित यास 10 हजारांची मदत करण्यात आली.
याप्रसंगी नाते आपुलकीचे सल्लागार श्री.उमेश पारखी,सदस्य श्री.तुळशीरामजी पानघाटे,श्री.बंडूभाऊ वैरागडे, श्री.विवेकभाऊ येरणे,श्री.राजेशजी कांबडे आणि सुमितचे आई,वडील उपस्थित होते. नाते आपुलकीचे ही संस्था सर्व सदस्यांच्या सहकार्याने समाजाभिमुख काम करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असते हे पुन्हा प्रकर्षाने समाजासमोर आले आहे.