ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जगन्नाथबाबा वारकरी भजन मंडळ उत्कृष्ट भजन मंडळ पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  गेल्या ३५ वर्षांपासून चंद्रपूर परिसरात वारकरी भजनाच्या माध्यमातून संतांचा मानवतावादी विचारांचा प्रचार प्रसार करणारे सद्गुरू श्री जगन्नाथबाबा वारकरी भजन मंडळास उत्कृष्ट भजन मंडळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

      राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने देवाडा येथील माणिक कुटी भवनात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी मंडळाचे अध्यक्ष बळीराम बेलेकर व सर्व सदस्यांना पुरस्काराने सन्मानित केले.

     श्रावण मासाच्या पवित्र पर्वावर माणिक कुटीत भजनानंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ श्रीगुरुदेव प्रचारक राजेंद्र हजारे, परिषदेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रावण बानासुरे, समाजसेवक देवराव कोंडेकर, पत्रकार प्रभाकर आवारी, माजी सैनिक श्री. तुमसरे, हजारे,  रजनी बोढेकर, भजन गायक संजय बोढाले आदींची उपस्थिती होती.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले. तर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी संत साहित्य, भजन प्रभाव संबंधाने समयोचित भाष्य करून भजन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.भजनानंद सोहळ्यात रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान, जो सत्याविना न बोले, गुरुकृपेला ज्ञान हवे, विटेवरी उभा देव असा आदी अजरामर भक्ती गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भजन गायक म्हणून उद्धव वडस्कर, देवराव कन्नाके, नत्थुजी उरकुंडे, प्रभाकर मरसकोल्हे, देवराव वझे, गोविंदराव जोगी, राकेश बोबडे आदींनी उत्तम सेवा दिली.

सांगडी (तेलंगण राज्य) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन समितीच्या वतीने उत्तम सहयोगाबद्दल ज्येष्ठ प्रचारक राजेंद्र हजारे यांचा श्री गुरुदेव प्रचारक पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत बोबडे, सौ.योगिता कोंडेकर, भाग्यश्री बोबडे, कु. ऋतुजा कोंडेकर,चिं. ऋग्वेद कोंडेकर आदींनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये