जिवती तालुका व वनपट्टाधारक गावांतील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत फार्मर आयडी मधून सूट

चांदा ब्लास्ट
केंद्र शासनाच्या 8 ऑगस्ट 2025च्या आदेशानुसार, जिवती तालुक्यातील शेतक-यांना व जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतक-यांना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीपासून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे फार्मर आयडी नसतानाही ते योजनेत सहभागी होऊ शकतात.
खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करीता उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई ही अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवडण्यात आली आहे. योजनेत खरीप व रब्बी हंगामातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाईची गणना पीक कापणी प्रयोग/तांत्रिक उत्पादनाच्या आधारे केली जाईल.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीप 2025 साठी विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांचा हप्ता (प्रति हेक्टर) पुढीलप्रमाणे आहे:
भात : विमा संरक्षीत रक्कम (प्रति हेक्टर) 61 हजार रुपये असून शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम 1,220 रुपये (प्रति हेक्टर)
खरीप ज्वारी : विमा संरक्षित रक्कम 33 हजार, भरावयाचा हप्ता 82.50 रूपये
सोयाबीन : विमा संरक्षित रक्कम 58 हजार, भरावयाचा हप्ता 580 रुपये
तुर : विमा संरक्षित रक्कम 47 हजार, भरावयाचा हप्ता 117.50 रुपये
कापूस : विमा संरक्षित रक्कम 60 हजार, भरावयाचा हप्ता 1,200 रुपये
नोंदणीची अंतिम मुदत : बिगर कर्जदार शेतकरी (CSC मार्फत) – 14 ऑगस्ट 2025, कर्जदार शेतकरी (बँक मार्फत) – 30 ऑगस्ट 2025
जिवती तालुक्यातील शेतक-यांनी तसेच फार्मर आयडी नसलेल्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक शाखा व ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात विहित मुदतीत विमा हप्ता भरून जास्तीत-जास्त संख्येने योजना लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रीय, तालुका किंवा जिल्हा कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.