ऑटोरिक्षा चालकांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे ठोस पाऊल!
नवीन ऑटोस्टॅण्ड, रिक्षा चालकांसाठी उपाययोजना ; नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालक- मालकांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नियोजन भवन येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये रिक्षाचालकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले. हे निर्णय शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच रिक्षा चालकांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीतही सुधारणा घडवतील, असा विश्वास देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृह येथे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या समस्यांसंदर्भात आयोजित बैठकीत आ. श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला संजीव रेड्डी बोदकूरवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, डॉ. मंगेश गुलवाडे, तसेच नम्रता आचार्य ठेमसकर, अजय सरकार, बंडू गोरकार, ऑटो मालक चालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर राऊत, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की, “महानगरपालिकेचे अधिकारी व ऑटो चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून व्यापारीदृष्ट्या उपयुक्त ठिकाणी ऑटोस्टॅण्ड विकसित करावेत. या स्टॅण्डमध्ये वाहतूक सुलभता, पार्किंग व्यवस्था व इतर सुविधा विचारात घेऊन उत्तम डिझाईन करावे.”बल्लारपूर, मुल, राजुरा, गडचांदूर, भद्रावती व गोंडपिपरी येथे देखील संभाव्य ठिकाणांची पाहणी करून ऑटो स्टॅण्डसाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी निधी रस्ते सुरक्षा योजना-2016 व डीपीडीसी अंतर्गत उपलब्ध करून दिला जाईल. ई-रिक्षा केवळ गरजू आणि पात्र व्यक्तींनाच वितरित व्हाव्यात, यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने सुसंगत धोरण तयार करावे. ई-रिक्षा केवळ विशिष्ट मार्गांवरच चालवण्याचा प्रस्ताव असून, यासंबंधी लवकरच समर्पक मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. याशिवाय सर्व वितरकांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. 31 रिक्षा स्टॅण्डची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगाली कॅम्प परिसरात दोन नवीन रिक्षा स्टॅण्ड विकसित केले जातील.
आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, “ऑटो रिक्षा चालक ही केवळ एक वाहतूक सेवा नसून, शहराच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन ठोस आणि समन्वयात्मक निर्णय घेणे ही आमची जबाबदारी आहे. शासन आणि चालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, यासाठी या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जावी, अश्या सूचना यावेळी आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.