उद्योगांच्या मागणीनुसार प्रशिक्षित आणि कुशल मनूष्यबळ तयार करणार
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर येथील आय.टी.आय.च्या प्रगतीचा घेतला आढावा
चंद्रपूर : उद्योगविश्वातील बदलत्या मागणीनुसार प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर राहणार असल्याचा निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. बल्लारपूर येथील आय.टी.आय.च्या प्रगतीचा त्यांनी अलीकडेच आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बल्लारपूर येथील राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे पूर्णतः नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे कार्य गतीने सुरु आहे. ही संस्था केवळ प्रशिक्षण केंद्र न राहता, महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि आधुनिक पायाभूत सुविधा असलेले आदर्श औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व्हावे, हा ठाम संकल्प आहे. उद्योग जगतातील बदलत्या मागण्यांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी ही पायाभूत गुंतवणूक आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक देखील झाली. या बैठकीला लाॅयड मेटल्सचे वरीष्ठ व्यवस्थापक अमित जय सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता संजोग मेंढे, एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डाॅ. राजेश इंगोले, बल्लारपूर शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजरत्न वानखेडे, कनिष्ठ अभियंता खोरगडे आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘यापूर्वी स्मार्ट आय.टी.आय. म्हणून विकसित करण्यासाठी 15 कोटी निधी मंजूर करून देण्यात आला होता. यामध्ये संस्थेच्या इमारतीचे संपूर्ण नूतनीकरण, आधुनिकीकरण, फर्निचरचे कार्य करण्यात येत आहे. आयटीआयचे औद्योगिक अवजारांच्या डिझाईनमध्ये एक भव्य प्रवेशद्वार (गेट) उभारावे. हवाईपट्टीसारखा रेडियम लाईनयुक्त रस्ता तयार करण्यात यावा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांची भरती तातडीने करण्याची आवश्यकता आहे.’ तसेच येथील ट्रेडनिहाय विद्यार्थ्यांची संख्या आणि नोकरी लागण्याची टक्केवारी मोजून अहवाल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
उद्योगजगतातील मागणीनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आयटीआयच्या माध्यमातून विविध उद्योग व कंपन्यांशी बैठकांचे आयोजन करण्यात यावे. तसेच संस्थेतील स्टाफ व इन्स्ट्रक्टर यांच्यासमवेत सविस्तर बैठक घेऊन प्रशिक्षणासाठी आवश्यक वस्तू, यंत्र आणि साधनसामूग्रीची मागणी नोंदवावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ‘या प्रशिक्षण संस्थेमध्ये सोलार टेक्निशियन, आर्टिफिशियल प्रोग्राम असिस्टंट, इलेक्ट्रिकल व्हेईकल मेकॅनिक आदी कोर्स प्रस्तावित आहे. त्यासोबतच येथील नविन स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या प्रस्तावित इमारतीचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे बल्लारपूर आयटीआय हे महाराष्ट्रातील एक आदर्श, आधुनिक व सुसज्ज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास येईल,’ असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांची स्थिती, आवश्यक साहित्य व उपकरणांची गरज तसेच उद्योगांच्या मागणीनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था याबाबत आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सविस्तर आढावा घेतला.