महसूल सप्ताहानिमित विविध उपक्रमाचे आयोजन
लोकसहभागातून महसूल प्रशासनाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
पत्रकार परिषदेत तहसीलदार कौटकर यांचे प्रतिपादन
वरोरा : महसूल दिन व महसूल सप्ताहाचे औचित्य साधून गुरुवारी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तहसीलदार योगेश कौटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की “महसूल दिन” हा १ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो आणि त्यानिमित्ताने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान “महसूल सप्ताह” राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लोकसहभागातून महसूल प्रशासनाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महसूल दिनापासून महसूल विभागाच्या कार्यप्रणालीला सुरुवात होते. या सप्ताहानिमित्त विविध शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप करणे, पांदन /शिव रस्ते मोजणी करून अतिक्रमण मुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविणे, विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन डीबीटी करून घेणे.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे य निष्कासित करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे. एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणाली प्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे. विभाग निहाय उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल संवर्गातील कार्यरत अधिकारी, सेवानिवृत्तअधिकारी, कर्मचारी यांचा यथोचित सत्कार – सन्मान करणे, नामांतरण व फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा उताऱ्याची अद्यावत माहिती देणे. विविध प्रमाणपत्रांचे जलद वितरण, जमिनीच्या नोंदीबाबत जनजागृती, ग्रामस्तरीय शिबिरे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शन आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
तहसीलदारांनी सांगितले की, महसूल विभाग हा सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट जोडलेला असून, त्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लाभ आणि मालमत्तेचे अधिकार प्राप्त होतात. या उपक्रमात पारदर्शकता, गती व जबाबदारी यावर भर दिला जाणार आहे.
कार्यक्रमात जनतेचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून विविध गावांमध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबिरे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.