ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 ते 7 ऑगस्टपर्यंत साजरा होणार महसूल सप्ताह

चांदा ब्लास्ट

जिल्हास्तरीय महसुली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे, महसूल गोळा करणे तसेच संबंधित कामे उत्कृष्ट पध्दतीने करणा-या व महसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार करण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

तसेच महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

असे राहील महसूल सप्ताहाचे स्वरुप : 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईल. महसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी -कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण व लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ.

2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप कार्यक्रम.

3 ऑगस्ट रोजी पाणंद/ शिवरस्त्यांची मोजणी करून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे.

4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे.

5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून अनुदानाचे वाटप करणे.

6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काषित करणे.

7 ऑगस्ट रोजी एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये