आदिवासी कोलाम बांधवांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – माजी आमदार संजय धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- आदिवासी समुदायातील कोलाम बांधवांचे नावे ग्रामीण बैंक गडचांदुर येथुन परस्पर कर्ज उचलुन समाज बांधवांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिवती तालुक्यातील मरकागोंदी,चिखली,निजामगोंदी, मारोतीगुडा,धनकदेवी येथिल गरीब आदिवासी बांधवांनी माजी आमदार संजयभाऊ धोटे यांचेकडे आर्थिक पिळवणुकिची आपबिती सांगितली.
माजी आमदार संजय धोटे यांनी याबाबत पोलिस निरीक्षक गडचांदुर, पोलिस निरीक्षक कोरपणा येथे लेखी तक्रार नोंदवुन जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून आरोपिंना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.
सन २०२२ मध्ये जिवती तालुक्यातील शेतमजूर असलेल्या कोलाम बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला द्यायचा आहे असे सांगून विनायक राठोड रा.सारंगापुर ता.जिवती व त्यांचे सहकारी तसेच तत्कालीन बैंक व्यवस्थापक हजारे यांचे सहकार्याने ५० पेक्षा अधिक कोलाम बांधवांचे नावे प्रत्येकी १ लक्ष ५० हजार रूपयांची बनावट ७/१२ दाखवुन कर्ज उचलले. आणि आदिवासींना फक्त ५ ते १० हजार रूपये देऊन त्यांची फसवणूक केली.८ दिवसांपुर्वी ग्रामीण बैंक गडचांदुर यांनी कर्ज वसुलीसाठी नोटीसा दिल्या.तेव्हा प्रथमता माहिती समोर आली.
यात फसवणूक झाल्याचे समजताच संबंधित बांधवांनी माजी आमदार संजय धोटे यांना ही बाब अवगत करून दिली.त्यांनी लगेच पोलिस स्टेशन कोरपणा व पोलिस स्टेशन गडचांदुर गाठुन पोलिसांत फसवणूकिची तक्रार दाखल केली.
विनायक राठोड व त्याचे सहकाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आल्याचे संजय धोटे यांनी सांगितले.
यावेळी माजी संजय धोटे यांचे समवेत युवा उद्योजक निलेश ताजणे,भाजपा जेष्ठ नेते संदिप शेरकी,जेष्ट नेते शिवाजी शेलोकर,पत्रकार अनिल कौरासे,कुणाल पारखी,सुयोग कोंगरे,अजिम बेग,शुभम थिपे यांचे सह मौजा सारंगापुर, मरकागोंदी,धनकदेवी,मारोतीगुडा, निजामगोंदी, चिखली येथील असंख्य पिडीत महिला व पुरुष उपस्थित होते.