ताज्या घडामोडी

लाडकी बहीण म्हणुन पुरुषांचीही नोंदणी? – 14 हजारांवर पुरुषांची नोंदणी झाल्याची शक्यता

21 कोटी पेक्षा जास्त निधी पुरुषांनी लाटला? - चौकशी करून गुन्हे दाखल करणार - महसूलमंत्री बावनकुळे

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

शिंदे सरकारच्या कार्यकाळात अत्यंत गाजावाजा करून व ज्या योजनेमुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असा दावा करण्यात येणारी लाडकी बहीण योजना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे नव्या माहितीवरून दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक सरकारला लक्ष करीत असतात. ह्या योजनेवर होणाऱ्या वारेमाप खर्चामुळे अनेक विकास कामांना खीळ बसल्याचे आरोप होत असुन ह्या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे पगार देखिल थकीत असल्याची ओरड होत असल्यामुळे सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींची छाननी करण्याचा निर्णय घेतला. ह्या छाननीमध्ये अनेक अपात्र बहिणींनी शासनाची फसवणूक करून योजनेचा लाभ घेतला. कित्येक शासकीय सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनीही बेकायदेशीररित्या कमी उत्पन्न दाखवुन लाडक्या बहिणींच्या निधीवर डल्ला मारल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना योजनेच्या लाभातून वगळण्यात आले.

अशातच आज नव्या उलगड्यामुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांनी घेणे अपेक्षित असताना राज्यातील 14288 वर पुरुषांनी ह्या योजनेत नाव नोंदवून चक्क लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले असुन ह्या बोगस लाडक्या भावांनी शासनाचे तब्बल 21 कोटी रुपये गिळले असल्याचेही समोर आले आहे. ह्यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ह्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ह्या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असुन संपुर्ण चौकशी करून लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या पुरुषांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. मात्र ज्या शासकीय कर्मचारी महिलांनी नियमबाह्यपणे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी झाल्यास आश्चर्य नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये