लांबोरी येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती !
जिवती पोलिसांच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूरचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- एकीकडे विज्ञानाने प्रगती करत भारताने चंद्रावर पाऊल ठेवले , तर दुसरीकडे आपल्या समाजात रुचत असलेली अंधश्रद्धा फोफावतच चाललेली आहे. समाजासाठी घातक ठरत असलेली हीच अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्याकरता शेकडो वर्षांपूर्वी आपल्या देशातील संतांनी प्रयत्न केले. त्यानंतर येत्या ४० वर्षापासून अंधश्रध्दा निर्मुलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत आहे.
तरी समाजासाठी घातक ठरत असलेली हीच अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्यासाठी जिवती पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या पुढाकाराने तालुक्यातील लांबोरी येथे ‘अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती’ कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूरचे समन्वयक अनिल दहागावकर यांनी“भूत- भानामती, करणी – जादूटोणा, राशिभविष्य, ग्रहदशा हे सर्व आपल्याला भीती दाखवून पैसा कमवायला ढोंगी बुवा बाबांनी रचलेले शब्दांचे खेळ असून, यात गुरफटक जाऊन समाजाची व परिवाराची हानी करू नका. विज्ञानाने भरारी घेत मंगळ – चंद्रावर पावले ठेवली. मात्र अंधश्रद्धेमुळे आपली पावले स्मशानाकडे वळत आहेत, फक्त समाजाचेच नाहीतर जंगल आणि पर्यावरणाचे ही मोठे नुकसान होत असल्याचे सांगून, अंधश्रद्धा सोडा समाज आणि देश बलवान बनवा!”
असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
तसेच अं.नि.स. चंद्रपूरचे समन्वयक धनंजय तावाडे यांनी नरबळी आणि माणूस अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ व जादूटोणा विरोधी कायदा वैज्ञानिक दृष्टिकोन पोलीस आणि ग्रामस्थ यांना समजावा तसेच अंधश्रद्धेमुळे नरबळी सारखे प्रकार थांबवले जावे यासाठी चमत्कारा मागचे रहस्य विविध प्रयोग करून उलगडून दाखवले.
यावेळी जिवती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, पोलिस शिपाई जगदीश मुंडे, अतुल कानवटे तसेच पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी व लांबोरी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.