सायबर सुरक्षा म्हणजेच डिजिटल काळातील ढाल – सुदाम राठोड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात “सायबर गुन्हा जाणीव व जागृती” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक सुदाम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम राठोड, अरविंद मुसने, महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रा. प्रवीण आंबटकर, प्रा.दुर्गावती खोबाडकर, कुंजम शेंडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सायबर गुन्हे म्हणजे काय, ते कसे घडतात, सामान्य व्यक्ती त्यापासून कशी वाचू शकते, तसेच ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, सोशल मीडिया हॅकिंग, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक यांसारख्या प्रकारांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सुदाम राठोड यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावले की, कोणतीही माहिती शेअर करताना दक्षता कशी घ्यावी, आणि सायबर गुन्हा घडल्यास कोणत्या पोलीस यंत्रणेला संपर्क करावा.कारण सायबर सुरक्षा म्हणजेच डिजिटल काळातील ढाल आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर कार्यक्रमातून स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, “जास्तीत जास्त लोकांनी सायबर सुरक्षिततेची माहिती घेणे ही काळाची गरज आहे,” असे कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश राठोड यांनी सांगितले.अरविंद मुसने, प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रवीण आंबटकर यांनी केले,तर संचालन प्रा. दुर्गावती खोबाडकर व आभार कु. राखी पोटदुके हिने केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात आपले शंका समाधान केले.