ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात जिवती तालुक्याला सुवर्ण पदक

देशपातळीवर कार्यक्षमतेचा ठसा; महाराष्ट्रातून एकमेव तालुक्याची निवड

चांदा ब्लास्ट

केंद्र शासनाच्या नीती आयोग अंतर्गत देशातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी ‘आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम’ राबवला जात आहे. देशभरातील ५०० आकांक्षीत तालुक्यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली असून या अभियानात महाराष्ट्रातील २७ तालुक्यांचा समावेश आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशकांची १०० टक्के पुर्तता केल्यामुळे जिवती तालुक्याला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे नीती आयोगाच्या संपुर्णता अभियानात जिवती तालुक्याने देशपातळीवर आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे.

‘संपूर्णता अभियान – टप्पा १’ हे विशेष अभियान जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबवण्यात आले. या टप्प्यात आरोग्य, पोषण आहार, मृदा आरोग्य कार्ड, उमेद (महिला सक्षमीकरण), पायाभूत सुविधा व वित्तीय समावेशन या सहा मुख्य निर्देशांकांमध्ये १०० टक्के कार्यान्वयन साध्य करणे, हे उद्दिष्ट होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव जिवती तालुक्याने सहा निर्देशांकांमध्ये १०० टक्के पूर्तता साध्य केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव जिवती तालुक्याची निवड झाली.

या अद्वितीय यशाबद्दल नीती आयोगातर्फे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष विनय गौडा यांना सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर अभियान यशस्वी करण्यास जिल्हा परिषद, चंद्रपूर या कार्यालयाचा मोलाचा वाटा असून आकांक्षीत जिल्हा अभियानाशी निगडित सर्व अधिकारी, कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे २८ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान संपन्न होणार आहे.

हे यश जिल्हा प्रशासनाच्या कटीबद्ध प्रयत्नांचे व सर्व विभागांतील समन्वित कार्यप्रदर्शनाचे फलित असून, भविष्यातही चंद्रपूर जिल्हा विकासाच्या वाटचालीत नवे उच्चांक गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये