मोरवा विमानतळाचा रनवे वाढवून आधुनिक सुविधा उभारा – आ. जोरगेवार
हिवाळी अधिवेशनात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत मागणी

चांदा ब्लास्ट
राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मोरवा विमानतळाचा रनवे वाढविणे तसेच तेथे आधुनिक आणि सुसज्ज प्रवासी सुविधा उभारण्याची मागणी केली आहे. यावेळी सदर मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. मोहोळ यांना दिले आहे.
चंद्रपूर हा जिल्हा औद्योगिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून राज्यातील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोळसा उत्खनन, औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, सिमेंट उद्योग, संरक्षण उत्पादनाशी संबंधित प्रकल्प, घनदाट वनसंपदा तसेच जागतिक पातळीवर ओळख असलेले पर्यटनस्थळ असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याची आर्थिक घडी वेगाने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य करण्यासाठी हवाई संपर्क अत्यंत आवश्यक बनला आहे.
सध्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी मोरवा एअर स्ट्रिप ही एकमेव हवाई सुविधा उपलब्ध आहे. मात्र सद्यस्थितीत या एअर स्ट्रिपवर मर्यादित सुविधा असल्याने व्यावसायिक विमानसेवा सुरू करणे शक्य होत नाही. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या तांत्रिक अभ्यासानुसार आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुधारणा केल्यास मोर्वा विमानतळावर ATR- 72 प्रकारचे प्रवासी विमान सहजपणे उतरू शकतात. यासाठी रनवेची लांबी किमान 1850 मीटरपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबतच आधुनिक टर्मिनल इमारत, प्रवासी प्रतीक्षालय, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, रात्रीच्या वेळेस उड्डाणासाठी आवश्यक प्रकाश व्यवस्था, वाहनतळ तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्याची गरजही येथे आहे. या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातून नागपूर, मुंबई, दिल्ली, रायपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क निर्माण होऊ शकतो.
मोरवा विमानतळाचा विकास झाल्यास औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल, स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच जिल्ह्याचा दळणवळणाचा नकाशाच बदलून जाईल. विशेषतः उद्योग, व्यापार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात चंद्रपूरला मोठा फायदा होणार आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यास चंद्रपूर जिल्हा केवळ औद्योगिक केंद्र म्हणूनच नव्हे तर आधुनिक पायाभूत सुविधांनी सज्ज जिल्हा म्हणूनही राष्ट्रीय स्तरावर ओळखला जाईल. असे सदर निवेदनात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.



