घुग्घुस ग्रामीण पतसंस्थेच्या जबरदस्ती वसुलीवरून संताप
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित (रजि. नं. ३५९) यांच्याकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गरीब कुटुंबांच्या घरी जाऊन महिलांना पोलिसांच्या मदतीने घेराव घालून जबरदस्तीने वसुली आणि मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पाच वर्षांपूर्वी संस्थेकडून अनेक गरजू नागरिकांना कर्जाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, काही लाभार्थ्यांकडून वसुलीत अडथळा निर्माण झाल्याने संस्थेने आता मोठ्या टक्केवारीसह वसुली करताना पोलिसांच्या मदतीने बळजबरीची भूमिका घेतली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे घुग्घुसचे अमित बोरकर यांनी याप्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित पोलिस विभागाशी चर्चा केली. चर्चा दरम्यान असे स्पष्ट झाले की, संस्थेच्या वतीने पोलिसांकडे कोणताही अधिकृत जप्ती अर्ज दाखल न करता बेकायदेशीररित्या पोलिसांची मदत घेतली जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर अमित बोरकर यांनी महिलांना सोबत घेऊन चंद्रपूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली व कायदेशीर तक्रार दाखल केली.
या संपूर्ण प्रकरणात जर पुढील सात दिवसांत संबंधित संस्थेवर कारवाई झाली नाही, तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली अमित बोरकर यांनी दिला आहे.
यावेळी गणेश उईके, मारुती जुमानले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.