ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेतील गैरव्यवहारावर काँग्रेसचा आक्रमक

तातडीने चौकशीची मागणी

चांदा ब्लास्ट

घुग्घुस  : शहरातील “आधारस्थंभ” पतसंस्थेतील नुकत्याच उघड झालेल्या गैरव्यवहाराची शाई अजून वाळलेली नसताना, आता “घुग्घुस ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित”च्या भोंगळ कारभारावर काँग्रेसने थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहाय्यक निबंधक यांची भेट घेऊन संस्थेविरोधात तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.

सलामे कुटुंबाची व्यथा

पीडित रामदास सलामे या आदिवासी नागरिकाने 2011 मध्ये संस्थेकडून ₹50,000 कर्ज मागितले असता त्यांना ₹44,400 चा धनादेश देण्यात आला, तसेच पूर्वत: ₹2,500 रोखीने घेतल्याचेही आरोप आहेत. त्यानंतर सलामे कुटुंबाला दरमहा ₹1,800 हप्ते भरण्यास सांगितले गेले. कुटुंबाने नियमितपणे पैसे भरले, मात्र संस्थेने पावत्या दिल्या नाहीत.

त्यानंतर संस्थेने या कर्जावर लाखोंची थकबाकी दाखवून घर जप्तीचा आदेश काढला, ज्यामुळे घाबरून सलामे कुटुंबाने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्याकडे धाव घेतली. संस्थेचे अध्यक्ष भेटण्यास नकार देत असल्यामुळे काँग्रेसने पीडित कुटुंबासोबत सहाय्यक निबंधक कार्यालय गाठून तक्रार दाखल केली.

काँग्रेसकडून गंभीर आरोप

तक्रारीत खालील गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत:

संस्थेचा अध्यक्ष निवडणूक न घेता गुपचूप कारभार करत आहे; वन मॅन शोप्रमाणे संस्था चालवली जाते.

संस्थेच्या वार्षिक आमसभा घेतल्या जात नाहीत आणि भागधारकांना अहवाल सादर केला जात नाही.

संस्थेचा मागील तीन वर्षांपासून सरकारी लेखापरीक्षण (ऑडिट) झालेला नाही.

वार्षिक अहवालाची छपाई करून तो भागधारकांना दिला जात नाही, मात्र अहवालाच्या छपाईचे बिल मात्र जोडले जाते.

थकीत कर्जदार सभासदांकडून वारंवार व्याज आकारणी करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जातो.

काँग्रेसची मागणी

या सर्व प्रकारांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

याप्रसंगी काँग्रेस नेते सय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, दीपक पेंदोर, रामदास व शारदा सलामे उपस्थित होते.

या प्रकरणी आता प्रशासन काय भूमिका घेते आणि संस्थेविरुद्ध काय कारवाई केली जाते, याकडे घुग्घुसकरांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये