जीएमसीमध्ये ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’
अभियानांतर्गत १५०१ वृक्ष लागवड
चांदा ब्लास्ट
राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण २१.२५ टक्के आहे. जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतुबदल याची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानांतर्गत कर्मवीर मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात १५०१ वृक्ष लागवड करण्यात आली.
सदर वैद्यकीय महाविद्यालयाला ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानांतर्गत १५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शरद कुचेवार यांनी संस्थेतील सर्व अध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याशी योग्य समन्वय साधून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच कर्मवीर मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील नवीन परीसरातील खुल्या जागेमध्ये १५०१ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पार पाडले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिद कांबळे, प्राध्यापक डॉ. शरद कुचेवार, डॉ. प्रिती पुप्पलवार, डॉ. बी.बी. भडके, डॉ. अरुण हुमणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. निवृत्ती जिवने, डॉ. अजय चंद्रकापूरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुलेश चांदेकर, डॉ. नादीया नुर अली संस्थेतील इतर अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नवीन परीसरातील खुल्या जागेत लावण्यात आलेल्या सर्व १५०१ झाडांचे योग्य संगोपन, देखभाल व देखरेख करण्याच्या सूचना संबंधित बांधकाम कंपनी शापुरजी पालनजी यांना देण्यात आल्या.