जीवघेण्या रस्त्याचे त्वरित बांधकाम करा
नगरपरिषदला शिवसेनेचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ चौकातील पारेलवार दूध डेरी ते केसुरली जाणारा रस्ता हनुमान नगर तसेच केसुरलीपर्यंत अपघाताला आमंत्रण देणारा आहे. या रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळायला मार्ग नाही. हा रस्ता पूर्णपणे खड्डामय झाला असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिणामी जीव हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा रस्ता किल्ला वार्ड, हनुमान नगर, बंगाली कॅम्प, केसुरली तसेच बाजार वार्डातील लोकांना बाजारपेठेत ये-जा करण्यातसाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे दिनांक 11 जुलै 2025 रोज शुक्रवारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळाकी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून या रस्त्याचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक नंदू पढाल, किल्ला वार्डातील ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम मत्ते, उपशहर प्रमुख प्रशांत सातघरे, युवा सेना तालुका संघटक सतीश आत्राम उपस्थित होते.