शहरातील मुख्य रस्त्यावरील दगडांची पूजा करून शिवसेनेचे अनोखे आंदोलन
भद्रावती नगर पालिका झोपेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
बाजार मार्केट परिसरातील जामा मस्जिद ते केसुरली या मुख्य मार्गावरील पारेलवार डेअरी यांच्या दुकानासमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दगडांचे साम्राज्य पसरले आहे. या दगळाणंमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही सुद्धा जाणीव पूर्वक भद्रावती नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. अखेर नागरिकांच्या आवाजाला बळ देत शिवसेना रस्त्यावर उतरली असुन शिवसेनेच्या वतीने या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक अनोखे आणि तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
या दगळांना शेंदूर लावून त्यांची विधीवत पूजा करण्यात आली, नारळ फोडण्यात आले आणि “देव” झालेल्या गोट्यांमुळे प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडले. यावेळी शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक दीप गारघाटे, शिवसैनिक राज चव्हाण व इतर कार्यकर्ते यांनी देखील सक्रीय सहभाग घेतला.
यावेळी प्रशासनास स्पष्ट इशारा देण्यात आला असुन “येत्या सात दिवसांत जर हे गोटे हटवले गेले नाहीत, तर त्या जागेवर शिवसेनेच्या वतीने त्याच गोट्यांचे भव्य मंदिर उभारण्यात येईल, आणि त्याचे उद्घाटनही करण्यात येईल!”
हे आंदोलन एकप्रकारे प्रशासनाच्या झोपेचा भंग करण्याचा निर्धार होता आणि भविष्यात नागरिकांच्या अडचणींवर प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास, शिवसेना अशा आणखी ठोस आणि ठिणगी पेटवणाऱ्या आंदोलनांसाठी तयार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.