२०० युनिट मोफत वीज : निवडणुकीचं वचन की विसरलेलं स्वप्न?
किशोर जोरगेवारांवर जनतेचे प्रश्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर (महाराष्ट्र): चंद्रपूरच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे – “किशोर जोर्गेवार अजूनही २०० युनिट मोफत वीज मिळावी, ह्याबाबत बोलतील का?”
किशोर जोर्गेवार – हे नाव एकेकाळी अपक्ष आमदार म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर होतं. जनतेशी जवळीक, संघर्षशील भूमिका आणि स्पष्ट बोलणं ही त्यांची ओळख होती. आज ते भाजपचे आमदार आहेत आणि सलग दुसऱ्यांदा चंद्रपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता असताना त्यांच्या प्रभावाची चर्चा होते. पण आता जनतेचा सवाल आहे – “तेच जोर्गेवार अजूनही २०० युनिट मोफत वीज देण्याचं वचन पूर्ण करतील का?”
आता सत्तेत, तरीही मौन?
जेव्हा ते अपक्ष होते, तेव्हाही ते २०० युनिट मोफत वीज मिळावी म्हणून आंदोलन करत होते. प्रत्येक सभेत, प्रत्येक मुलाखतीत हेच वचन दिलं जात होतं. पण आता सत्ताधारी पक्षाचे आमदार झाल्यानंतर, त्यांच्या वाणीतील ती धार कमी झाली आहे का? की हे वचनही निवडणुकीत वापरलेलं एक हत्यार होतं जे आता ‘कागदां’पुरतंच मर्यादित आहे?
जुने समर्थक, नवी शांतता
कधी कधी कोणतेही आंदोलन, निवेदन किंवा घोषणा न करणंही मोठा संदेश देतं. निवडणुकीपूर्वी जे कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था हे मुद्दे मोठ्या आवाजात मांडत होते, आज त्यांचं मौनही संशयास्पद वाटतं. सत्तेच्या जवळ गेल्यावर लोकांचे प्रश्न मागे पडतात का? की ‘प्रतिमा’ राखण्यासाठी जनहिताची मागणी दाबली जाते?
दिशाभूल की विकास?
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अनेक मुद्दे गाजत आहेत – भ्रष्टाचार, बेकायदेशीर बांधकामं, बनावट शिक्षक, “नोट फॉर सेल” घोटाळे, ३३ कोटी वृक्षारोपणाचा फसवा दावा, रोजगारात बाहेरच्यांचं वर्चस्व – हे सर्व मुद्दे इतक्या वेगानं समोर येत आहेत की खऱ्या गरजांचे प्रश्न मागे पडत चाललेत. २०० युनिट वीजसारखी मूलभूत गरज आता चर्चेच्या झगमगाटात हरवते आहे.
जनता जागी आहे
आजची जनता जुनी नाही. ती ऐकते, पाहते, आणि लक्षात ठेवते. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर प्रश्न विचारणे ही तिची जबाबदारी आहे. किशोर जोर्गेवार हे खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी असतील, तर त्यांना ‘२०० युनिट मोफत वीज’ या विषयावर आता स्पष्ट आणि ठोस भूमिका घ्यावी लागेल – अन्यथा पाच वर्षं फक्त आश्वासनांच्या चक्रात फिरत जातील.
चंद्रपूर विधानसभेत आता फक्त भाषणं चालणार नाहीत. कृती हवी आहे. २०० युनिट मोफत वीज हे वचन जनतेच्या हिताचं होतं की निवडणुकीसाठी दिलेला शब्द, हे लवकरच स्पष्ट होईल. किशोर जोर्गेवार हे सत्तेच्या कुबड्यांवर चालणारे आमदार आहेत की जनतेच्या आशा आणि अपेक्षांना उत्तर देणारे खरे नेते – हे येणाऱ्या काळात सिद्ध होईल.
कारण जनतेला विसरण्याची सवय नाही… आणि प्रश्न विचारणं हा तिचा हक्क आहे.