ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये मोहरम श्रद्धा व भाविकतेने साजरा

ठिकठिकाणी फुलाव व थंड पाण्याचे स्टॉल

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात रविवारी मोहरमचा पवित्र सण अत्यंत शांतता, श्रद्धा आणि सामूहिक भाविकतेने साजरा करण्यात आला. शहरभर धार्मिक वातावरण पसरले होते आणि नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. “या हुसैन” च्या गजरांनी रस्ते दुमदुमून गेले.

या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, मोहल्ला समित्या आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने शहरातील अनेक ठिकाणी फुलाव, फळे, शरबत, थंड पाणी, बर्फ व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. श्रद्धाळूंना प्रेमाने सेवा देत नगरवासींनी अतिथीभाव दाखवला. काही ठिकाणी स्थानिक तरुणांनी स्वयंसेवक म्हणून पाणीवाटप, गर्दी नियंत्रण आणि मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडली.

मिरवणूक मार्गांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून विशेष देखरेख ठेवण्यात आली होती.

या निमित्ताने धार्मिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडले. विविध समाजघटकांतील लोकांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्याचे आणि बंधुत्वाचे उदाहरण प्रस्थापित केले. नागरिकांनी सांगितले की, घुग्घुसमध्ये मोहरम दरवर्षी अत्यंत शिस्तबद्ध आणि श्रद्धेने साजरा केला जातो आणि यंदाही ही परंपरा कायम राहिली.

नगर परिषद, पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहकार्याने हा सण शांततेत, भव्यतेने आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये