आ.सुधीर मुनगंटीवार खत वितरणातील गैरप्रकारांविरोधात उद्या देणार तक्रार!
शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी आ. मुनगंटीवार यांचा ठाम पवित्रा

चांदा ब्लास्ट
कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरूद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात उद्या तक्रार दाखल करणार
बल्लारपूर : शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या खत पुरवठाधारकाविरोधात आता कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे उद्या, शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता बल्लारपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत.
शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रासायनिक खत कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड नामांकित कंपनीकडून वितरित केले जाते. मात्र, या खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तूंची “लिंकिंग” करून चिल्लर विक्रेत्यांवर जबरदस्ती केली जाते. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो, कारण त्यांना ही अनावश्यक उत्पादने खरेदी करूनच खत मिळते. परिणामी, शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाची स्थिती निर्माण होते.
या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या लूटप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. “शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणीही अधिकृत तक्रार देऊन उद्या करणार आहेत.